पुणे : भारतीय लष्करात महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील साळुंखे विहार परिसरात राहत्या इमारतीच्या आवारात ते गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेची नोंद कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी हे निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. बुधवारी सकाळी सुमारे 9.30 वाजता त्यांनी घरकाम करणाऱ्या व्यक्तीला थंडी जाणवत असल्याने उन्हात बसण्यासाठी गच्चीवर जात असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर इमारतीतील रहिवाशांना ते खाली आवारात पडलेले दिसले. यानंतर घरकाम करणाऱ्या व्यक्तीला माहिती देण्यात आली आणि त्यांच्या मुलीला घटनेची कल्पना देण्यात आली.
मुलगी तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर जोशी यांना रुग्णवाहिकेतून सदर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्यांच्या मुलीचा जबाब नोंदवला आहे. त्यांना यापूर्वी चक्कर येण्याचा त्रास होत होता आणि काही वेळा घरातही ते पडले होते, अशी माहिती मुलीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या 8 वर्षांपासून त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीबाबत कुटुंबाला कोणतीही शंका नसल्याचेही समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अशोक जोशी यांनी भारतीय लष्करात दीर्घकाळ सेवा बजावली होती. 1965 आणि 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी लष्करात ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग’ (DGMT) हे महत्त्वाचे पदही सांभाळले होते. त्यांच्या निधनाने लष्करी क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.






