लोणी काळभोर, ता. 19: पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार केलेले असतानाही आदेश धुडकावून लोणी काळभोरमध्ये प्रवेश करणाऱ्या फिरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (ता. 18) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विरकर वस्ती परिसरात करण्यात आली आहे.

गणेश बाळासाहेब विरकर (वय 40, रा. विरकर वस्ती, रामदार रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी सरकारच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे हे तपास पथकात कार्यरत असताना पोलीस अंमलदार अशोक गिरी आणि गणेश खरात यांच्यासोबत बुधवारी (ता. 18) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी विरकर वस्ती परिसरात तडीपार केलेला सराईत गुन्हेगार आल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली.

या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विरकर वस्ती परिसरात धाव घेतली. यावेळी एका शेतातील झाडाखाली गणेश विरकर बसलेला दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला काही अंतरावरच पकडले.
चौकशीदरम्यान, पुणे शहर पोलीस सहआयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार तसेच परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशान्वये 1 जून 2026 पासून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तडीपार कालावधीत पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचेही त्याने सांगितले.
दरम्यान, तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गणेश विरकर याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 – 135,142,37(1)(b),37(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.






