सागर जगदाळे

तक्रारवाडी: गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनची गळती थांबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. कामगार मिळत नाहीत, ब्रेकर उपलब्ध होत नाही, अशी वेगवेगळी कारणे पुढे येत असताना दुसरीकडे मात्र या गळतीच्या पाण्यावर परिसरातील झाडेझुडपे चांगलीच हिरवीगार झाली आहेत. एवढेच नव्हे, तर खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून त्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार झाले आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी तर सुरूच आहे; पण नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारवाडीतील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती लागून बराच काळ लोटला आहे. गळती शोधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला खड्डा खोदण्यात आला. मात्र अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. ही गळती सिमेंटच्या रस्त्याखाली असल्याने रस्ता फोडण्यासाठी ब्रेकरची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कधी कामगार मिळत नाहीत, तर कधी ब्रेकर उपलब्ध होत नाही, अशा कारणांमुळे काम रखडल्याचे चित्र आहे.

दरम्यान, खड्ड्यात साचलेल्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार झाले असून परिसरातील झाडेझुडपेही हिरवीगार झाली आहेत.
एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे सार्वजनिक पाइपलाइनमधून पाणी वाहत राहते. गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले नसले, तरी या पाण्यावर झाडेझुडपे मात्र जोमाने वाढली आहेत. ग्रामपंचायतीच्या दुरुस्ती कामाला मुहूर्त मिळत नसताना झाडांच्या वाढीला मात्र मुबलक पाणी मिळत असल्याचा उपरोधिक टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.
प्रशासक विलास बंडगर यांची प्रतिक्रिया
“सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनची गळती सिमेंटच्या रस्त्याखाली असल्याने तो फोडण्यासाठी ब्रेकरची आवश्यकता आहे. ब्रेकरवाला काल येणार होता; मात्र काही अडचणींमुळे येऊ शकला नाही. आजपासून कामाला सुरुवात करून लवकरात लवकर गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
दोन दिवसांत गळती न थांबल्यास खड्ड्यात वृक्षारोपण करणार – अक्षय वाघ
“येत्या दोन दिवसांत तक्रारवाडी ग्रामपंचायतीने पाण्याची गळती थांबवली नाही, तर खोदलेल्या खड्ड्यात गांधीगिरीच्या मार्गाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येईल,” असा इशारा जागृत नागरिक अक्षय वाघ यांनी दिला आहे.
आता प्रश्न एवढाच की, सार्वजनिक पाण्याच्या गळतीवर फुललेली झाडेझुडपे प्रशासनाला दिसत नाहीत का? की गळती थांबण्यापूर्वीच या खड्ड्याचे रूपांतर वृक्षारोपणाच्या जागेत होण्याची ग्रामपंचायत वाट पाहत आहे का?






