मुंबई : दिवाळीचा सण संपल्यानंतर अनेकांना तुळशी विवाहाची उत्सुकता लागते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असून, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी तुळशी मातेचा विवाह भगवान विष्णूंच्या शाळिग्राम स्वरूपाशी लावण्याची परंपरा आहे. या विवाहानंतर लग्नसराईसह इतर शुभकार्यांना सुरुवात होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेष म्हणजे हा सोहळा घरच्या घरी साध्या पद्धतीनेही करता येतो.

तुळशी विवाह 2026 कधी आहे? शुभ मुहूर्त जाणून घ्या
यंदा शनिवार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल. तर 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 57 मिनिटांनी समाप्त होईल.
तुळशी विवाहासाठी विशेष खर्च करण्याची गरज नसते. सर्वप्रथम तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी. तुळशीच्या रोपाला लाल साडी किंवा नवीन वस्त्र नेसवून फुले, हार, हळद आणि कुंकवाने सजवावे. ऊस आणि फुलांच्या मदतीने छोटासा मंडप तयार करता येतो.

दुसरीकडे भगवान शाळिग्राम किंवा विष्णूची मूर्ती स्वच्छ करून पाटावर ठेवावी. त्यांना पिवळे वस्त्र, फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावे. विवाहाच्या वेळी दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणण्याची परंपरा आहे.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. संध्याकाळी शुभ मुहूर्तावर गणपतीचे स्मरण करून पूजेला सुरुवात करावी. तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. शाळिग्रामाला गंध, फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावे. दोघांसमोर दिवा लावून नैवेद्य दाखवावा.
त्यानंतर अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणावीत आणि अक्षता टाकून विवाहाचा विधी पूर्ण करावा. शेवटी तुळशी आणि शाळिग्रामाची आरती करून प्रसाद वाटावा. काही घरांमध्ये तुळशीची ओटी भरणे आणि महिलांना हळदी-कुंकू देण्याची प्रथाही आहे.






