पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्गाच्या उभारणीला लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पुढील 2 महिन्यांत सुरू होण्याचा अंदाज असून, यामुळे प्रवाशांचा सुमारे सव्वा तासाचा वेळ वाचणार आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड, भोसरी, मोशी आणि विशेषतः चाकण एमआयडीसी भागात वाहनांची मोठी गर्दी होते. हा मार्ग तयार झाल्यावर या पट्ट्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. लांब पल्ल्याची वाहने आणि स्थानिक वाहतूक वेगवेगळी झाल्याने प्रवास अधिक वेगवान होईल तसेच पेट्रोल-डिझेलची बचत होईल.
या कामासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी 97 टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले आहे. थोड्याच प्रमाणात राहिलेली जमीन ताब्यात घेतल्यानंतर कामाची गती अधिक वाढणार आहे.

हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 60 वर नाशिक फाटा ते खेड दरम्यान सुमारे 30 किमी (29.92 किमी) अंतराचा असेल. एकाच खांबावर आधारित 8 पदरी उड्डाणपूल, खालच्या बाजूला 6 पदरी मुख्य रस्ता आणि दोन्ही कडेला 2 पदरी सेवा रस्ते अशी याची रचना असेल.
या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 7,827 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काम सुरू झाल्यानंतर किंवा कंत्राट दिल्यापासून साधारण 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.






