डॉ. अशोक बालगुडे

पालघर : निवडणुकीत उमेदवारी नाकारली की निष्ठेची परीक्षा सुरू होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पालघरच्या राजकारणात आला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला पालघरमध्ये राजकीय धक्का बसला आहे.
वनगा यांच्याबरोबरच जव्हारमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा प्रवेश केवळ एका माजी आमदारापुरता मर्यादित न राहता पालघर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारा ठरण्याची शक्यता आहे.

वनगा हे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत. 2019 मध्ये अविभाजित शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना उमेदवारी नाकारून राजेंद्र गावित यांना संधी दिली. या निर्णयामुळे वनगा नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.
राजकीय निष्ठेच्या बदल्यात अपेक्षित संधी न मिळाल्याने वनगा यांनी आता भाजपचा पर्याय स्वीकारला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटासमोर स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची बांधणी टिकविण्याचे आव्हान उभे राहू शकते. दुसरीकडे, वनगा आणि हबीब शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशातून भाजपने पालघरमध्ये संघटनात्मक विस्ताराची संधी साधली आहे.
राजकारणात निष्ठा, संधी आणि सत्तेची समीकरणे सतत बदलत असतात. मात्र, प्रत्येक पक्षांतरामागे केवळ व्यक्तीचा निर्णय नसतो; त्यातून पक्षांतर्गत असंतोष, नेतृत्वावरील नाराजी आणि स्थानिक राजकीय महत्त्वाकांक्षाही उघड होतात. पालघरमधील या पक्षप्रवेशाने पुन्हा एकदा हेच वास्तव समोर आणले आहे. आता या प्रवेशाचे रूपांतर भाजपला प्रत्यक्ष राजकीय लाभात करता येते का, हे आगामी काळच ठरवेल.






