पुणे : पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने नागरिकांसाठी एक विशेष निर्णय घेतला आहे. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आज रविवारी शहरातील उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने प्रशासनाने उद्यानांच्या वेळेत ही वाढ केली आहे.

सामान्यत: उद्याने रात्री लवकर बंद होतात, मात्र या विशेष दिवशी वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार उद्याने सकाळी 6.00ते 11.00 आणि सायंकाळी 4.00ते रात्री 12.00 या कालावधीत खुली राहतील. महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. अशोक घोरपडे यांनी सर्व पुणेकरांना या सुविधेचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या पुणे महापालिकेच्या अखत्यारीत शहरात एकूण 216 उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या सुंदर उद्यानांमध्ये दररोज लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री निसर्गरम्य वातावरणात आणि मोकळ्या हवेत नागरिकांना एकत्र येऊन सण साजरा करता यावा, यासाठी महापालिकेने ही विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे.







