पुणे : महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत असून ऑक्टोबर हिटसोबतच वातावरणात संमिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुपारी कडक ऊन आणि उकाडा जाणवत असतानाच, सकाळी आणि मध्यरात्रीनंतर हवेत हलका गारवा अनुभवायला मिळत आहे. या हवामान बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज 25ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरण प्रामुख्याने कोरडे राहील. तरीसुद्धा, किनारपट्टीच्या काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांमध्ये उष्ण तसेच दमट वातावरण राहील. यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट दिला आहे. दुसरीकडे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह त्यांच्या घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता नसून हवामान पूर्णपणे कोरडे राहील.धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट क्षेत्रातही पावसाचा कोणताही अंदाज नसून हवा सुकी राहील.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून वातावरण कोरडे राहणार आहे.तर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. येथेही हवामान सामान्य व कोरडे राहील.
एकंदरीत, राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस विश्रांती घेणार असला तरी, कोकण किनारपट्टीवरील वाढता उकाडा आणि दिवसा व रात्रीच्या तापमानातील फरक यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.







