मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या BEST बस प्रवासात कोळी महिलांना सध्या एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दक्षिण मुंबईतील ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथून पहाटे 4 वाजल्यापासून ताजे मासे घेऊन उपनगरांमध्ये जाणाऱ्या या मच्छीविक्रेत्या महिलांना वातानुकूलित बसमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मुंबईत सध्या जुन्या साध्या बसच्या ऐवजी नवीन इलेक्ट्रिक AC बसेस मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. मात्र, माशांचा वास येत असल्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होईल, असे कारण पुढे करून बसचालक या कोळी महिलांना बसमध्ये घेण्यास साफ नकार देत आहेत. काहींनी तर महिलांना पाहताच बसचे दरवाजे बंद केल्याचेही समोर आले आहे.
पारंपरिक मासेमारी व्यवसायाच्या माध्यमातून मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या या भूमिपुत्र कोळी महिलांना सार्वजनिक वाहतुकीत अशा प्रकारच्या भेदभावाला आणि अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. मुंबईच्या संस्कृतीचा व परंपरेचा एक भाग असलेल्या कोळी महिलांच्या या प्रवासाचा आणि रोजगाराचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







