पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे वरिष्ठ नेते धनंजय मुंडे हे अचानक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत दोन्ही नेत्यांमध्ये सध्या महत्त्वपूर्ण विषयांवर संवाद सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही भेट वैयक्तिक अथवा कौटुंबिक कामासाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी या अचानक झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

या भेटीपूर्वी, शरद पवार गटाचे बीडमधील खासदार बजरंग सोनवणे यांनी काही गंभीर आरोप केले होते. त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करत वाल्मिक कराड प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले. कराड हे कारागृहात बंदिस्त असतानाही तेथून काही कार्यकर्त्यांच्या थेट संपर्कात असल्याचा दावा सोनवणे यांनी केला होता.जिल्ह्यात भीतीचे किंवा दहशतीचे वातावरण पसरू नये यासाठी राज्य शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी खासदारांनी केली. या प्रकरणात गृहमंत्रालयाने स्वतः लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

सोनवणे यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच धनजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट घडल्याने, या बैठकीत वाल्मिक कराड प्रकरणावर आणि जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर काही विशेष चर्चा होत आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, या संभाषणाचा मुख्य हेतू काय होता आणि त्यातून काय निर्णय निघतो, याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.







