दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील लढत ही सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय ठरली आहे. यावेळी या मतदारसंघात तीन तगडे उमेदवार मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या सुत्रानुसार जागावाटपात ही जागा भाजपाला जाणार हे निश्चित होते त्यानुसार झालेही भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना ही उमेदवारी महायुतीकडून मिळाली त्यामुळे राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार गट) माजी आमदार रमेश थोरात यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळवली. त्यामुळे या दोन आजी-माजीमध्ये लढत होणार असे चित्र असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वीरधवल जगदाळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आता महायुतीकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष असून युतीधर्मानुसार दौंड तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने भाजपचे काम करावे असे सूत्र असताना उलट उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीच्या मतदानामध्ये विभाजन होऊन महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना अडचण निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर दौंडमध्ये पहिल्यांदाच म्हणजे अनेक वर्षानंतर तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यांच्या उमेदवारीने राहुल कुल आणि रमेश थोरात या दोघांनाही धडकी भरली असल्याचे चित्र आहे. वीरधवल जगदाळे कोणाची मते खेचतात याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.
अटीतटीची लढत..
२०१९ ला दौंडमध्ये राहुल कुल विरूद्ध रमेश थोरात अशी लढत झाली. यावेळी अत्यंत अटीतटीची लढत झाली. यात राहुल कुल यांचा विजय झाला. राहुल कुल यांना १ लाख २ हजार ७६३ मते मिळाली. तर रमेश थोरात यांना १ लाख २ हजार ९० मते मिळाली. ६७३ मतांनी राहुल कुल यांचा विजय झाला होता आता मतदारसंघात तीन उमेदवार मैदानात असतील तर मतविभागणी निर्णायक ठरू शकते. त्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) यांची मते दोन उमेदवारांत विभागली आणि भाजपाची मते एकवटली तर राहुल कुल यांचे पारडे जड होऊ शकते.