उरुळी कांचन, (पुणे) : मागील दीड महिन्यापासून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून, चोरट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक घरफोड्या आणि चोऱ्या होत असताना अद्याप अनेक गुन्ह्यांचा छडा लागलेला नसल्याने उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या होत असल्याने गुन्हेगारांना खाकीचा धाक उरला आहे की नाही? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाही, उरुळी कांचन पोलीस प्रशासन मात्र ‘ऑल इज वेल’च्या भूमिकेत असल्याची संतप्त चर्चा परिसरात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. 8) पहाटेच्या सुमारास उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात दीपक गावडे यांच्या घरातील पैंजण, घंटन आणि कानातील झुमके असा तब्बल तीन ते सव्वा तीन तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे, चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, चोरट्यांचे चेहरे कॅमेऱ्यात कैद होऊनही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज असूनही तपासाची गाडी नेमकी कुठे अडली? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस ठाणे चोरीच्या वाढत्या घटनांना कधी लगाम घालणार आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांना कधी बेड्या ठोकणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘खबऱ्यांचे नेटवर्क’ गेले कुठे..?
गुन्हे घडल्यानंतर आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, मागील एक ते दीड महिन्यात घडलेल्या चोरीच्या घटनांचा तपास कितपत पुढे गेला? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरील माहिती, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार चोरीच्या घटना घडूनही तपासाला अपेक्षित गती मिळत नसल्याने ‘डीबी पथक नेमके करते तरी काय?’ असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तगडी यंत्रणा असतानाही चोरट्यांची मुजोरी..
पोलीस यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध असतानाही भुरट्या चोऱ्यांपासून घरफोड्यांपर्यंतच्या घटनांना आळा बसत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्याचा फायदा चोरटे घेत आहेत का, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. चोरीच्या घटनांमुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतानाही नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एकीकडे नागरिकांच्या घरातील कष्टाची कमाई आणि दागिने चोरटे लंपास करत आहेत, तर दुसरीकडे चोरट्यांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







