उरुळी कांचन, (पुणे) : गावडेवाडी-शिरसवडी परिसरात बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात अडवून गोळीबार करत तब्बल लाखोंचे दागिने लुटणाऱ्या परराज्यातील सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-7 आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर येथून अवघ्या 24 तासांत तिघांच्या मुसक्या आवळल्या.

अविनाश क्रिशनचंद्र त्रिपाठी (वय-43, सध्या रा. बकोरी, जि. पुणे; मूळ रा. उत्तर प्रदेश – मुख्य सूत्रधार), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय-32, रा. भिलवल, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश), महंमद शोएब वसीम खान (वय 37, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर उत्तर प्रदेशात खून, दरोडा आणि प्राणघातक हल्ल्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, यातील मुख्य सूत्रधार उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’च्या चकमकीत पकडला गेलेला सराईत गुंड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,व्यावसायिक संतोष गावडे यांचे वाडेबोल्हाई चौकात जमीन खरेदी-विक्री व्यवसायाचे कार्यालय आहे. बुधवारी बुधवारी (ता. 05) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करून ते आपल्या कारने गावडेवाडीतील घरी चालले होते. गावडेवाडीतील पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर पोहोचताच एका दरोडेखोराने आपली दुचाकी बंद पडल्याचे नाटक करून संतोष गावडे यांची कार अडवली. गावडे यांनी कार थांबवताच, दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या त्याच्या इतर दोन साथीदारांनी कारला गराडा घातला.

काही समजण्याच्या आत एका दरोडेखोराने पिस्तुल काढून संतोष गावडे यांच्या दिशेने थेट गोळी झाडली. गोळी कारची काच फोडून थेट गावडे यांच्या चेहऱ्याला लागली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील 22 तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या संतोष गावडे यांच्यावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे पुणे ग्रामीण आणि आयुक्तालय हद्दीत प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींनी सोडलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींची नावे व ओळख पटवली. आरोपी गुन्ह्यानंतर थेट मध्य प्रदेशातील इंदूर येथे पळून गेल्याचे निष्पन्न होताच, पुणे पोलिसांच्या पथकाने इंदूर गाठले आणि तेथे धाडसी सापळा रचून तिघांच्याही मुसक्या आवळल्या.
दरम्यान, मुख्य सूत्रधार अविनाश त्रिपाठी याच्यावर उत्तर प्रदेशात खून, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न असे 20 गंभीर गुन्हे नोंद आहेत. 2018 मध्ये उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ने लखनौ येथे झालेल्या चकमकीत त्याला अटक केली होती. सुरेंद्रपाल पाल याच्यावर उत्तर प्रदेशात चोरी व दरोड्याचे 12 ते 13 गुन्हे दाखल आहेत. महंमद खान याच्यावर उत्तर प्रदेशात 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.







