पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि उद्योगांच्या विस्तारासाठी उपलब्ध नसलेली जागा लक्षात घेता आता मावळ तालुक्यात नवीन औद्योगिक क्षेत्र उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. तळेगाव परिसरातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या 3 गावांमध्ये मिळून सुमारे 1100 एकर म्हणजेच जवळपास 405 हेक्टर जागेवर नवीन MIDC विकसित केली जाणार आहे.

या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी प्राथमिक सर्वेक्षण तसेच जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूसंपादनासाठी कलम 32(2) अंतर्गत दरनिश्चितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांत सरकारकडून जमिनीचे दर निश्चित झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित MIDC मध्ये वेगवेगळ्या गावांमधून जमीन घेतली जाणार आहे. ब्राह्मणवाडीमध्ये सुमारे 183 हेक्टर, करंजमध्ये 135 हेक्टर आणि बऊरमध्ये 87 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात उद्योग वाढले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्याचबरोबर उपलब्ध पायाभूत सुविधांवर ताण वाढला असून उद्योगांच्या भविष्यातील विस्तारासाठी जागेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे काही कंपन्या पर्यायी ठिकाणांचा विचार करत असल्याचे चित्र आहे.
मावळातील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राला पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि महामार्गाची चांगली जोडणी मिळणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि उद्योगांसाठी आवश्यक कनेक्टिव्हिटी सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील पाबळ येथेही सुमारे 700 हेक्टर क्षेत्रावर नवीन MIDC उभारण्याचा प्रस्ताव आहे. या जागेची मोजणी लवकरच सुरू होणार असून त्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.







