पुणे: विवाहासाठी योग्य जोडीदार शोधताना ऑनलाइन संकेतस्थळावर अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पुण्यातील जनवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेची मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीने तब्बल 21 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने लग्नासाठी एका विवाहविषयक वेबसाइटवर आपली माहिती नोंदवली होती. याच वेबसाइटवर आरोपीने फ्रान्समधील एका प्रसिद्ध कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करत असल्याचे भासवणारे बनावट प्रोफाईल तयार केले होते. त्यानंतर त्याने महिलेशी संपर्क साधून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

काही दिवस संवाद झाल्यानंतर आरोपीने आपण फ्रान्सहून भारतात महिलेला भेटण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्याने नवी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर कस्टम विभागाने आपल्याकडील 8 हजार युरोचे परदेशी चलन जप्त केल्याचे सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागणार असल्याचे सांगून त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली.

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याने दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे तिने एकूण 21 लाख 89 हजार रुपये जमा केले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपीने अचानक तिच्याशी संपर्क तोडला. फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.






