नेपाळ : नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात पुरामुळे हाहाकार उडाला असून शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक भारतीय नागरिकही अडकले असून 240 हून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत, तर 128 जणांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. या कठीण परिस्थितीत मदतकार्याला वेग आला असून आतापर्यंत 108 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, तर 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने नेपाळच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलली आहेत. भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे शोध व बचाव मोहिमेसाठी आवश्यक उपकरणे, तज्ज्ञांचे पथक आणि डीएनए चाचणीसाठी विशेष वैद्यकीय टीम पाठवण्यात आली आहे. याशिवाय रस्ते मोकळे करण्यासाठी लागणारे साहित्य आणि तात्पुरते (पोर्टेबल) पूल तयार करण्याचे साहित्यही पाठवले जात आहे. भारताकडून आतापर्यंत एकूण 68.5 टन मदत साहित्य नेपाळला सुपूर्द करण्यात आले आहे.

रसुवा येथील एका जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या रिपू कुमार, चेनेश्वर नरझरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन या भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात पथकाला यश आले आहे. दुसरीकडे, चीनच्या हद्दीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत मिळणे सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांत चीनमधून 598 भारतीय नागरिक नेपाळमध्ये सुरक्षितपणे पोहोचले आहेत. उर्वरित सुमारे 900 भारतीय नागरिक अजूनही चीनमध्ये सुरक्षित असून ते आपल्या नातेवाईकांच्या सतत संपर्कात आहेत.

मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रात्रंदिवस काम करत आहेत. बाधित भागात रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यासाठी 16 ट्रक भरून साहित्य रवाना करण्यात आले आहे. दोन्ही देशांचे प्रशासन आणि बचाव पथके मिळून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.







