पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षक भरतीसाठी वयाची अट असल्याने पात्र असूनही काही उमेदवारांना संधी मिळत नव्हती. मात्र, शिक्षण आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार खासगी शाळांमधील नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादेची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.
दरम्यान, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022च्या आधारे ज्या संस्थांना मुलाखतीशिवाय पदनिश्चितीचा पर्याय देण्यात आला आहे, तेथे शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. नियुक्तीपूर्वी उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसोबत जात, जात वैधता, दिव्यांग तसेच समांतर आरक्षणाशी संबंधित आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत.

इयत्ता पहिली ते पाचवीसाठीटीईटी किंवा सीटीईटी पेपर-1, तर सहावी ते आठवीसाठी संबंधित विषयानुसार पेपर-2 पात्रता आवश्यक आहे. नववी ते बारावीच्या पदांसाठी संबंधित शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पूर्ण करणे गरजेचे आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी 7 ते 11 सप्टेंबरदरम्यान पदस्थापनेचे समुपदेशन केले जाणार आहे.

कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांची पोलीस चारित्र्य पडताळणी आणि नियमानुसार वैद्यकीय तपासणी होईल. वयोमर्यादेची अट दूर झाल्याने अनुभवी उमेदवारांसाठीही शिक्षक होण्याचा मार्ग अधिक खुला झाला आहे.







