पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या घडामोडीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी आमदारांनी येत्या बुधवारी भेटीची वेळ मागितल्याची माहिती मिळत आहे. मात्र, शरद पवार यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत मान्यता किंवा वेळ मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,जेष्ठ नेते शरद पवार यांची प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली होती. त्यावेळी 10 तारखेला पुन्हा भेटून चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानंतर दोन्ही गट एकत्र येण्याच्या अथवा विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. आता सर्व आमदारांनीच शरद पवारांकडे वेळ मागितल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. तसेच बारामतीत सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे 45 मिनिटे महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामुळे राजकीय घडामोडी आणखी वेगवान झाल्या आहेत.
दरम्यान, पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवार सध्या मुंबईतील त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी असून, प्रकृतीच्या कारणास्तव ते काही दिवस विश्रांती घेत आहेत.

भुजबळ कुटुंबीयांच्या भेटीनंतर आता थेट आमदारांनीच शरद पवारांना भेटण्यास उत्सुकता दाखवल्यामुळे आगामी काळात काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन सणासुदीच्या काळात ‘सिल्व्हर ओक’वर नक्की कोणत्या राजकीय हालचाली घडतात, याबद्दल राजकीय विश्लेषकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.







