पुणे : पुण्यातील जनवाडी परिसरामध्ये एका 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मेहुणीकडून मिळणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले असून, या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम अनिल जाधव (वय 30, रा. पाच पांडव सोसायटी, जनवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेमच्या आई लक्ष्मी अनिल जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पत्नी रेवती प्रेम जाधव (वय 25) आणि मेहुणी रितिका रमेश गजमल (वय 30) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम हा सध्या बेरोजगार होता आणि त्याच्या डोक्यावर काही कर्जही होते. याच गोष्टींवरून त्याची पत्नी रेवती आणि मेहुणी रितिका त्याच्याशी नेहमी किरकोळ कारणांवरून वाद घालायच्या. दोघीजणी मिळून त्याला सतत तीव्र मानसिक त्रास देत होत्या. या रोजच्या कौटुंबिक कलहाला आणि त्रासाला कंटाळून अखेर 4 नोव्हेंबर रोजी प्रेमने राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवले.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल पाटील करत आहेत. कौटुंबिक वादातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.







