पुणे : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात महाराष्ट्रातील एकूण 404 नागरिक अडकले होते. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत यातील 338 नागरिकांशी संपर्क झाला असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. या भीषण संकटातून बचावलेले महाराष्ट्रातील 41 पर्यटक शनिवारी सायंकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यामध्ये एकाच गटातील 37 जण आणि पुणे-मुंबईतील 4 इतर प्रवाशांचा समावेश होता.

परराष्ट्र मंत्रालयाने पाठवलेल्या 149 नागरिकांच्या यादीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतील उर्वरित 66 लोकांचा शोध व माहिती पडताळणीचे काम नेपाळमध्ये वेगाने सुरू आहे.आता महाराष्ट्रातील 41 पर्यटक शनिवारी सायंकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत.विमानतळावर आतुरतेने वाट पाहणाऱ्या नातेवाईकांनी फुलांचे गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. संकटातून सुखरूप परतलेल्या आपल्या आप्तस्वकीयांना पाहताच अनेक कुटुंबीयांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सर्व प्रवाशांनी मदत करणाऱ्या शासकीय यंत्रणांचे मनापासून आभार मानले.

आपला थरारक अनुभव सांगताना पर्यटकांनी एका विलक्षण योगायोगाचा उल्लेख केला. प्रमोद केणे, संतोष अलूरकर, शमा साठे, श्रीकांत ढवळे आणि वर्षा करी या पर्यटकांच्या मते, त्यांचा दौरा मूळ नियमानुसार 15 ऑगस्टला सुरू होणार होता. परंतु व्हीसा मिळण्यास एक दिवस उशीर झाल्याने त्यांनी 16 ऑगस्टला काठमांडूकडे प्रवास केला.

18 ऑगस्टला चीन सीमेवर इमिग्रेशन पूर्ण करून त्यांनी मानसरोवर परिक्रमा केली. परतीचा प्रवास करत असताना ते ‘सागा’ या सुरक्षित ठिकाणीच थांबले. जर त्यांचा प्रवास नियोजित वेळेनुसार झाला असता, तर ऐन जलप्रलयाच्या वेळी ते इमिग्रेशन सेंटरवर उपस्थित असते—ज्याचे या महापुरात प्रचंड नुकसान झाले आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना श्रीकांत ढवळे म्हणाले की, “पुढील बिकट परिस्थिती पाहून मनात अत्यंत भीती निर्माण झाली होती. परतीचे सर्व मार्ग बंद वाटत होते, पण आम्ही सागा येथेच थांबल्यामुळे आमचा बचाव झाला. ईश्वराची कृपा आणि भारत सरकारच्या तत्पर मदतीमुळेच आम्ही मायदेशी सुखरूप पोहोचू शकलो.”






