पुणे : विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेने पुणे शहर हादरले आहे. जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचाच तिच्या मुलाने निर्घृणपणे जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील वादानंतर मुलाने आईवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेत सविता सुरेश हरिभक्त (वय 48) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा अनिकेत सुरेश हरिभक्त (वय 30) याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सविता आणि अनिकेत दोघेही घरात होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर अनिकेतने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण होत असताना सविता यांनी मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केली. दरम्यान, अनिकेतने सविता यांचा गळा धारदार चाकूने चिरला. घरातून येणारा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी धावून आले. मात्र, घराचा दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना तातडीने आत प्रवेश करता आला नाही.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी सविता गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेल्या आढळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी आरोपी अनिकेतला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अनिकेत विवाहित असून त्याला दोन लहान मुले असल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला की हत्येमागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आईच्या हत्येच्या या घटनेने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.







