मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांसाठीच्या मदतयोजना आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, “आम्ही भाषण देणारे नाही, तर राशन देणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या कामांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि इंडिया आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून, लग्न ठरलेल्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशीन आणि २५ हजार सायकलींचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. शिक्षण, कर्जवसुली, वीजबिल, चारा आणि पाणी यांसह विविध बाबींमध्ये दुष्काळग्रस्तांना १२ प्रकारच्या सवलती दिल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची तातडीची मदत आणि अन्य आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मदतीबाबत आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला. विरोधक शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप करत, सरकारने कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकीय मुद्द्यांवर बोलताना शिंदे यांनी २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या जनादेशानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केल्याचा उल्लेख केला. या घडामोडीला त्यांनी ‘खरी वोटचोरी’ आणि ‘दरोडा’ असे संबोधले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर मतदार याद्या, वोटचोरीचे आरोप आणि न्यायव्यवस्थेबाबतच्या भूमिकेवरूनही त्यांनी टीका केली. विरोधक देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हा नवा भारत आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून मारणारा भारत आहे,” असे म्हणत शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे १५ खासदार, ७४ आमदार आणि एक हजारांहून अधिक नगरसेवक असल्याचा उल्लेख करत पक्षाची ताकद अधोरेखित केली. पक्षात होणाऱ्या प्रवेशांबाबत बोलताना त्यांनी ‘ऑपरेशन’चा उल्लेख केला आणि पक्षाची ताकद वाढत असल्याचा दावा केला.






