उरुळी कांचन : लहान मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने एका दलित कुटुंबावर लाठी, काठी आणि लोखंडी गजाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे घडली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेला तीन दिवस उलटूनही पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप होत आहे. वारंवार पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही गुन्हा दाखल होत नसल्याने उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास सोरतापवाडी गावात शिंदे कुटुंबीयांना काही जणांनी लोखंडी रॉड आणि इतर हत्यारांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचेही पीडितांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना मागील महिन्यात घडल्याचे समजते. त्यामुळे हा केवळ किरकोळ वाद नसून एका कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उत्कृष्ट तपासाचा दावा, मग पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष का?

राज्यात उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून नावाजलेल्या उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्याच्या व पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकीकडे गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीचे कौतुक होत असताना, दुसरीकडे मारहाणीला बळी पडलेल्या कुटुंबाला तक्रार दाखल करण्यासाठी वारंवार पोलिस ठाण्यात जावे लागत असल्याचा आरोप गंभीर आहे. घटनेला तीन दिवस उलटूनही पीडितांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष आणि पीडितांना न्यायासाठी प्रतीक्षा?
उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांबाबत यापूर्वीही नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता थेट मारहाणीच्या घटनेत पीडित कुटुंबाला न्यायासाठी पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप होत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप असून, आपल्या जीविताला धोका असल्याची भीतीही कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
पोलिस अधीक्षकांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
मारहाण झाल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितांना प्रतीक्षा करावी लागत असेल, तर पोलिस नेमकी कोणाची बाजू घेत आहेत? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पोलिस यंत्रणा जागी होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, सोरतापवाडी येथील दलित कुटुंबाला न्याय मिळणार की त्यांना न्यायासाठी आणखी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकारात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे






