पुणे : मुंबईहून पुण्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासातील वेळ तब्बल 60 ते 90 मिनिटांनी कमी होणार आहे.

सध्या दक्षिण मुंबईतून अटल सेतू ओलांडून पुढे गेल्यानंतर वाहनचालकांना पनवेल जंक्शन परिसरात मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. विशेषतः वीकेंडला आणि सणासुदीच्या दिवसांत या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अटल सेतूवरून उतरल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे गाठण्यासाठी जुनाच रस्ता उपलब्ध असल्याने चिर्ले आणि पळस्पे परिसरात प्रचंड कोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणारा उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे.
चिर्ले ते पळस्पे दरम्यान उभारला जाणारा हा रस्ता 7.35 किलोमीटर लांबीचा आणि 6 लेनचा (सहापदरी) आहे. MMRDA कडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे आतापर्यंत 67% काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.चिर्ले भागात 155 पैकी 153 खांब उभारण्यात आले असून 98% काम पूर्ण झाले आहे.डेक स्लॅबच्या 240 स्पॅनपैकी 117 स्पॅन तयार झाले आहेत.तर रेल्वे उड्डाणपुलाचे काम 85% पूर्ण झाले असून, पळस्पे भागात पाईल ग्रुप फाउंडेशनचे काम 71% पूर्ण झाले आहे.

हा उन्नत मार्ग खुला झाल्यानंतर केवळ पुणेच नाही, तर गोवा आणि बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होईल. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे जाणारी मालवाहू वाहने पनवेलच्या वाहतूक कोंडीत न अडकता थेट आपल्या मार्गाने जाऊ शकतील.

दरम्यान, याचसोबत प्रभादेवी स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल खुला करण्यात आला असून, त्यामुळे तेथील स्थानिक प्रवाशांचा प्रवासही आता अधिक सुलभ झाला आहे.






