राहुलकुमार अवचट

यवत: शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेल्या नऊ दिवसांपासून संपूर्ण देशात उत्साहाने व भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा होत करण्यात येत असून दसऱ्याला या उत्सवाची सांगता होत असते दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, यवत, पिंपळगाव, पाटस यांसह अनेक ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

यवत परिसरात ही नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला असून यवतची ग्रामदेवी श्री महालक्ष्मी माता मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता रावण दहनाने करण्यात आली.

दौंड तालुक्यातील देवीच्या प्रमुख मंदिरांपैकी कुरकुंभ येथील फिरंगाई माता व यवत येथील श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने नऊ दिवस विविध रुपातील आकर्षक पुजेची मांडणी, घटस्थापना ते दसरा या कालावधीत गरबा – दांडिया, जागरण गोंधळ, होम मिनिस्टर , जादू यांसह अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्रीनिमित्त महालक्ष्मी मंदिरात भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला होता तसेच यवत गावातील श्री तुकाई माता मंदिर, श्री काळभैरवनाथ मंदिर, साई व्हिलेज सोसायटी , म्हसोबा चौक , सहकार नगर , दोरगेवाडी येथे देखील पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिराला केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षक ठरली.
आज दसरानिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिर येथून सीमोल्लंघनासाठी पालखी काढण्यात आली. पालखीचे श्री महालक्ष्मी मंदिरात आगमन झाल्यानंतर देवीची आरती करून रावण दहन करून नवरात्र उत्सवाची सांगता झाली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे,ह.भ.प. नाना महाराज दोरगे, माजी सरपंच समीर दोरगे, काळभैरवनाथ देवस्थानचे सदानंद दोरगे , सतीश दोरगे, शंकर दोरगे, श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके, सचिव दत्तात्रय महाडिक, विश्वस्त काश्मिरा मेहता यांसह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीमोल्लंघनासाठी श्री काळभैरवनाथांची पालखी हजरत बडेशाहवली दर्ग्यात
यवत येथे दरवर्षी नवरात्र उत्सव सांगता व दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करणाऱ्या सीमोल्लंघनासाठी श्री काळभैरनाथांची पालखी हजरत बडेशाहवली दर्ग्यात जाते व सोने लुटणे सुरू केले जाते. गेल्या अनेक वर्षांची परंपरा यंदाच्या यवतकरांच्या वतीने ही कायम ठेवण्यात आली.
घटोत्थापन बाबतीत नागरिकांमध्ये चर्चा
शारदीय नवरात्र उत्सव समाप्ती ही घटोत्थापन – ‘कलश-उत्थापन करण्यात येत असते महाराष्ट्राचे कुलदेवी असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे घटोत्थापन व अनेक महत्त्वाच्या देवीच्या ठिकाणी आज मंगळवार दि. २० रोजी घटोत्थापन करण्यात आले परंतु यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर व श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे सोमवार दि . १९ रोजी एक दिवस पूर्वीच घटोत्थापन करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम व याबाबत सलग दोन दिवस मोठी चर्चा निर्माण झाली होती.






