पुणे : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करून धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पार्थ वासुदेव अवथळे (वय १९, रा. पिंपरी, बुलढाणा) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ४०, रा. करमाळा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास बारामतीतील पायलट ढाब्याजवळील पालखी महामार्गावरील विमानतळ परिसरात घडली. राणा सूर्यवंशी हे जागेची पाहणी करत असताना स्कूटीवरून दोघे जण तेथे आले. त्यापैकी एकाने त्यांना पुष्पगुच्छ दिला. त्यावेळी सूर्यवंशी यांनी सोबत असलेल्या पोलीस अंमलदार नितीन यांना फोटो काढण्यासाठी मोबाईल दिला. एका मुलाने मास्क घातल्याचे पाहून सूर्यवंशी यांनी त्याला मास्क काढण्यास सांगितले. त्याचवेळी त्या मुलाने पिस्तूल काढून त्यांच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी हल्लेखोराच्या हातावर फटका मारला. त्यामुळे त्याच्या हातातील पिस्तूल रस्त्यावर पडले. त्यानंतर हल्लेखोराने सत्तूर काढून सूर्यवंशी यांच्या उजव्या हाताच्या दंडावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोर पळून जात असताना पोलीस अंमलदार नितीन यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. मात्र, त्याला गाडीत बसवून नेत असताना त्याने पोलिसांच्या हाताला चावा घेतला आणि शेजारच्या शेतात उडी मारून पळ काढला.

जखमी सूर्यवंशी यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक तपासातून संशयित कर्वेनगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेची तीन पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह पार्थ अवथळे याला कर्वेनगर परिसरातून ताब्यात घेतले. तर ज्ञानदेव शिंदे याला भिगवण परिसरातून पकडण्यात आले. या हल्ल्यामागील कारणाचा शोध पोलीस निरीक्षक नारायण पवार घेत आहेत.






