सोलापुर: सोलापुरातील अकलूजमध्ये गर्भलिंगनिदान चाचणीचं मोठं रॅकेट समोर आलं होतं. गर्भलिंगनिदान प्रकरणातील संशयित डॉक्टर दांपत्याला अटक न करण्यासाठी पोलिसांनी लाचं घेतल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी तब्बल 25 लाखांची डील झाल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये आता 5.5 लाख स्विकारताना दोन एजेंटला अॅन्टीकरप्शन ब्र्युरोने अटक केली. दोघांच्या अटकेनंतर DYSP ची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

अकलूज पोलिसांनी 18 ऑगस्टला एक डमी रुग्ण पाठवून गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी डॉक्टरला अटक होईल, असं वाटत होतं. पण अकलूज पोलिसांनी सेटलमेंट केली अन् अटक टाळण्यासाठी 25 लाखाची लाच मागितली. त्यानंतर पुण्यातील ACB कडे या प्रकरणाची तक्रार गेली. अँन्टी करप्शन ब्र्युरोकडे शिंदेंनी आधीच 10 लाखाची लाच स्वीकारल्याचं समोर आलं. त्यानंतर शुक्रवारी 5.5 लाख रुपये देण्यात येणार होते. त्याचवेळी सापळा रचून दलालांना अटक करण्यात आली आहे.

थेट अकलूजचे पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस शिपायाच्या नावाने तब्बल साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना 2 दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने रंगेहाथ पकडलं. माळशिरस-पिलीव मार्गावरील ब्रिजखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आबा वळकुंदे आणि महादेव माने अशी अटक झालेल्या दलालांची नावे आहेत.

पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासाठी 5 लाखाची डील तर पोलीस शिपाई राहुल वाघ यांच्यासाठी 50 हजारांची डील झाली होती. दोन दलालांना अटक केल्यानंतर आता पोलीस शिपाई अन् पीएसआयवर गुन्हा दाखल झाला आहे.






