मुंबई: चेंबूर परिसरात गरोदर महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने आपल्या सुमारे 2 ते 2.5 महिन्यांच्या गर्भवती प्रेयसीला शीतपेयातून विषारी पदार्थ दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्रियकर आशिष मगर याला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 25 तारखेला पीडित महिला आणि आशिष यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता. वादानंतर काही वेळाने आशिषने सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवत महिलेला शीतपेय पिण्यास दिले. मात्र, या पेयामध्ये डांबराच्या गोळ्या मिसळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

शीतपेय प्यायल्यानंतर महिलेला अचानक उलट्या होऊ लागल्या. तिची प्रकृती वेगाने खालावत गेली. सुरुवातीला कुटुंबीयांना हा साधा आजार असल्याचे वाटले. मात्र, काही वेळाने तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

महिलेची प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयातून तिला शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी महिलेने आशिषने दिलेले शीतपेय प्यायल्यानंतरच आपल्याला त्रास सुरू झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते.
कुटुंबीयांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर तपासाला वेग आला. चौकशीदरम्यान आशिषने सुरुवातीला पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीनंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
वैद्यकीय तपासणीत विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आशिषविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.






