पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम (YCM) रुग्णालय परिसरात नियमांचे उल्लंघन करून गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतता क्षेत्रात विनापरवाना ढोल-ताशा आणि बॅंड वाजवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (YCM) परिसरामध्ये पी.जी.आय. वायसीएमएच गणेश मंडळाने विसर्जन मिरवणूक आयोजित केली होती. या परिसरात रुग्णालयातील रुग्णांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी शांतता झोन घोषित करण्यात आला होता. तसेच 14 सप्टेंबर 2026 च्या आदेशानुसार 16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2026 दरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आले होते.

या मंडळाकडून मिरवणुकीसाठी कोणतीही अधिकृत शासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती. बंदी आदेश आणि शांतता क्षेत्राचे नियम असतानाही ‘न्यू मयुर ब्रास बॅंड’ आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रुग्णांच्या आरोग्याचा विचार न करता आवाजाचे प्रदूषण करून शासकीय आदेशांचा अवमान केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे.

संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आशिष गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. उज्वला सुमेध अंदुरकर (अध्यक्ष), सविता निवृत्ती निगडे (कार्याध्यक्ष), डॉ. शैलेजा मनोज भावसार (उपाध्यक्ष), अमरदिप मोहन चांदगुडे (सचिव), वैभव जनार्धन देवकर (खजीनदार),ओंकार आढाव (मालक, न्यू मयुर ब्रास बॅंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 292, 3 (5) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 आणि ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) 2000 च्या कलम 6 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश आटवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






