मुंबई: करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी टॉक शो ‘कॉफी विथ करण’ पुन्हा चर्चेत आला आहे. या शोच्या 9 व्या सीझनच्या प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान दिसत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, हा सीझन शोचा शेवटचा भाग असू शकतो, असे संकेत प्रोमोमध्ये देण्यात आल्याने मनोरंजन विश्वात चर्चा सुरू झाली आहे.
सलमान खान याआधी ‘कॉफी विथ करण’च्या 4 थ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. आता पुन्हा एकदा तो करण जोहरसमोर खास अंदाजात दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये सलमानची एन्ट्री, त्याची मजेशीर शैली आणि करणसोबतची प्रश्नोत्तरे लक्ष वेधून घेत आहेत.

प्रोमोमध्ये करण जोहर सलमानला त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित एक थेट प्रश्न विचारतो. सलमान अजूनही व्हर्जिन आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेत्याने ‘कंट्रोल ब्रो, कंट्रोल’ असे उत्तर दिले. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे प्रोमोची चर्चा वाढली आहे.

यानंतर सलमान खान करणला शोच्या शेवटच्या सीझनबाबत प्रश्न विचारताना दिसतो. मोठ्या सेलिब्रिटींना बोलावण्यासाठी शेवटच्या सीझनचे कारण पुढे केले जात आहे का, असा त्याचा सवाल असतो. यावर करण जोहर हा शोचा शेवटचा सीझन असल्याचे सांगतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या पुढील वाटचालीबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

संवादादरम्यान करणने सलमानच्या बदललेल्या स्वभावाचाही उल्लेख केला. अभिनेता आता अधिक शांत आणि जमिनीवर पाय असलेला वाटतो, असे करण म्हणाला. त्यावर सलमानने अनेक वर्षे इतरांना सल्ले दिले असून, आता तेच स्वतःच्या आयुष्यात अमलात आणण्याची वेळ आल्याचे सांगितले.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि पापाराझींच्या वागणुकीचा विषयही या संवादात चर्चिला जात असल्याचे प्रोमोमध्ये दिसते. मात्र, या मुद्द्यांवर सलमान नेमके काय बोलतो, हे संपूर्ण एपिसोड पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल.






