मुंबई : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता एसआयटीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची तब्बल 9 तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली. या दीर्घ चौकशीनंतर त्यांना सध्या घरी सोडण्यात आले असले, तरी पोलिसांकडून त्यांना काही कडक अटी घालण्यात आल्या आहेत.

तपासाचा एक भाग म्हणून राजेंद्र शिंदे यांना थेट मुख्य आरोपींसमोर बसवून अनेक प्रश्न विचारण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. चौकशीनंतर राजेंद्र शिंदे यांनी, माझी चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर मी सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, पोलिसांच्या आदेशानुसार त्यांना पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहावे लागणार आहे. तसेच त्यांना ठाणे शहर सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जर काही विशेष कारणास्तव ठाणे बाहेर जाण्याची गरज भासल्यास, आधी पोलिसांची परवानगी घेणे त्यांना बंधनकारक असणार आहे.

दुसरीकडे, या खूनानंतर पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले होते. या हत्येमागे नेमका कोणता राजकीय किंवा वैयक्तिक वाद होता आणि खरा सूत्रधार कोण, याचा छडा लावण्यासाठी एसआयटीचे प्रमुख अमरसिंह जाधव आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख शैलेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कसून तपास सुरू आहे.

दरम्यान राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर आता लवकरच माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या प्रकरणात एसआयटीच्या आगामी तपासात आणखी कोणते मोठे खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







