पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात अत्यंत थरारक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. बोऱ्हाडेवाडी येथील ‘मंत्रा मोमेंट’ हाऊसिंग सोसायटीच्या एका गाळ्यासमोर 30 वर्षीय महिलेचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळला होता. मृत महिलेचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिस नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 2 वाजता या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत या गुन्ह्याची उकल केली. तपासात जी माहिती समोर आली, ती अत्यंत धक्कादायक होती. हा खून दुसरं तिसरं कोणी नव्हे, तर खुद्द मृत महिलेच्या पतीनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे.

कौटुंबिक वादातून हा पूर्वनियोजित कट रचण्यात आला होता. विशेष म्हणजे, पत्नीचा खून केल्यानंतरही आरोपींचे मन राहिले नाही. पोलिसांना ओळख पटवण्यापासून हुकमी मात देण्यासाठी आरोपींनी मृत महिलेचा चेहरा पूर्णपणे विद्रूप केला होता, जेणेकरून मृतदेह ओळखता येऊ नये.

प्रियांका आकाश कांबळे (वय 30, रा. मोरे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार पती आकाश उर्फ घाऱ्या रमेश कांबळे (वय 28, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी)तसेच प्रथम बालाजी कांबळे (वय 22, रा. भोसरी),रोहित दिनेश शिंदे (वय 19, रा. बोऱ्हाडेवाडी), दिनेश मधुकर वाघमारे (वय 19, रा. बोऱ्हाडेवाडी)अशा एकूण चौघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या भयानक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादातून एवढे टोकाचे पाऊल कसे उचलले जाऊ शकते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.






