पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी नुकतीच एक महत्त्वाची मध्यरात्री बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी मोठी घडामोड घडली आहे.

भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात उभे ठाकलेले बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन सानप या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सचिन सानप हे अनेक वर्षांपासून प्राध्यापक असून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लढा देत आले आहेत. तसेच, ते मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पॅटर्नच्या धर्तीवर पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानप यांच्या उमेदवारीला शिवसेना (शिंदे गट) कडून पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित बैठकीत पक्षाचे आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाला पाठिंबा देणार, या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.

या बैठकीमध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाची भूमिका, निवडणुकीची सविस्तर रणनीती आणि विजयाचे नियोजन यावर सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर बोलताना नेत्यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसून सर्वजण एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या उच्चस्तरीय बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, भावना गवळी, ओमराजे निंबाळकर, विजय शिवतारे, शहाजीबापू पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.







