पिंपरी-चिंचवड : कामावर गैरहजर राहिल्याबाबत जाब विचारल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस अंमलदारामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादानंतर अंमलदाराने आत्महत्येचा इशारा देणारा संदेश पाठवला आणि तो अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या शोधानंतर संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस अंमलदार कामावर गैरहजर होता. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला विचारणा केली. त्यानंतर दोघांमध्ये सकाळी शाब्दिक वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

या वादानंतर अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. तसेच, आत्महत्येचा इशारा देणारा संदेश पाठवून तो निघून गेला. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याचा शोध सुरू केला.

काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आरटीपीसीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर अंमलदाराने पाठवलेल्या संदेशामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तिथे जाऊन त्याला शोधले. तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याच्या अंमलदाराच्या आरोपांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.






