अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भेर्डापूर गावात राहणाऱ्या एका तरुण दाम्पत्याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. बाळासाहेब पांडुरंग पिसाळ आणि कीर्ती बाळासाहेब पिसाळ असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून खासगी सावकारीच्या त्रासामुळे प्रचंड मानसिक तणावात होते. सावकारांकडून सातत्याने पैशांसाठी तगादा लावला जात होता आणि त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. घटनेच्या दिवशी रात्री एका अज्ञात व्यक्तीचा फोन आल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांनी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले, असा गंभीर दावा मृत बाळासाहेब यांचे मेहुणे गणेश वाडीतके यांनी केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पिसाळ कुटुंबावर मोठा आघात झाला असून, त्यांच्या मागे एक 10 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. आई-वडिलांचे छत्र अचानक हरवल्यामुळे ही दोन्ही चिमुकली मुले आता पोरकी झाली आहेत.घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

खासगी सावकारांच्या बेकायदेशीर जाचामुळेच या दाम्पत्याला जीव गमवावा लागला, असा आरोप करत दोषी सावकारांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून सावकारांच्या जाचाचा हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत.






