पुणे: मावळ तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळत असून, चालू वर्षात आरएमके समूहाच्या माध्यमातून सुमारे 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीतून परिसरात 4,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाल्याची माहिती समूहाचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी दिली. विविध देशांतील कंपन्यांनी मावळमध्ये उद्योग सुरू केल्यामुळे या भागाचे औद्योगिक महत्त्व वाढत आहे.

आंबी येथील आरएमके इंडस्ट्रियल पार्कमध्ये एनर्जी इन मोशन कंपनीचा इलेक्ट्रिक ट्रक निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

एनर्जी इन मोशन ही कंपनी अवजड वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक ट्रक तयार करते. या तंत्रज्ञानामुळे वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होण्यासोबतच डिझेलचा वापर आणि प्रदूषणही कमी करण्यास मदत होऊ शकते. कंपनीकडून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला इलेक्ट्रिक ट्रक पुरवले जात आहेत. भविष्यात मुंबई-पुणे महामार्गावरही हे ट्रक धावण्याची शक्यता आहे.

आरएमके समूहाच्या माहितीनुसार, गेल्या 7 वर्षांत मावळ तालुक्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आली असून, 10,000 हून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत.







