रायगड : जिल्हा परिषदेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी धडक कारवाई करत लाचखोर स्वीय सहाय्यकाला रंगेहात पकडले. जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक योगेश भस्मे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्याने संपूर्ण प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे.

सध्या रायगड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान एका तक्रारदार शिक्षकाला त्यांच्या आवडीच्या आणि सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार शिक्षकाची लाच देण्याची अजिबात मानसिक तयारी नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट रायगड ‘ACB’ कडे धाव घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पडताळणी केली. भस्मे यांनी लाच मागितल्याचे उघड झाल्यानंतर पथकाने अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना भस्मे यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अध्यक्षांच्या अत्यंत जवळच्या आणि महत्त्वाच्या पदावरील कर्मचाऱ्यावरच ही कारवाई झाल्याने जिल्हा परिषद वर्तुळात भितीचे वातावरण पसरले आहे. शिक्षक बदल्यांमधील लाचखोरीचे हे लोण केवळ एका कर्मचाऱ्यापुरते मर्यादित आहे की यात प्रशासनातील किंवा राजकीय वर्तुळातील इतर कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध आता एसीबीचे पथक घेत आहे.







