मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरात राहणारे 30 वर्षीय आशिष मेटे यांचा अचानक झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे . ते महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. एका प्रसिद्ध पीआर कंपनीच्या मध्यस्थीने बाह्ययंत्रणेद्वारे हे काम पाहत होते. त्यांच्या या अकाली जाण्याने राजकीय आणि माध्यम वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण झाल्यानंतर आशिष मेटे हे आपल्या इमारतीच्या आवारात शतपावली करत होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. जमिनीवर पडताना त्यांच्या डोक्याला जोरदार फटका बसला आणि तीव्र दुखापत झाली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशिष यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते? त्यांना आधी हृदयविकाराचा झटका आला होता की डोक्याला लागलेली गंभीर दुखापत त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येईल. अवघ्या 30 व्या वर्षी आशिष मेटे यांचा अशा रीतीने दुर्दैवी अंत झाल्याने त्यांचे कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.







