पुणे : सप्तश्रुंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथील अभोणा चौफुलीवर एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. या दुर्दैवी दुर्घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या नवरात्रीच्या काळात सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून लाखो भाविक वणी गडावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. अभोणा चौफुली येथे नेहमीप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्याचे काम करत होते. त्याच वेळी अचानक आलेल्या एका अनियंत्रित चारचाकी वाहनाने तेथील पोलीस व नागरिकांना थेट उडवले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि इतर पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कारचालकाला पकडून मारहाण केली आणि वाहनाचे नुकसान केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चालकाला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण घटनेमुळे पोलीस दलासह सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.






