पुणे : यंदा राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने कोरड्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताशी आलेली पिके पूर्णपणे वाळून गेल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.अशातच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचे पाऊल उचलले आहे. बळीराजाची दिवाळी सुखाची व्हावी यासाठी शासनाने 5 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.तसेच दुष्काळी परिस्थिती आणि वाढती जागतिक आर्थिक मंदी या पार्श्वभूमीवर राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. हा वाढता आर्थिक भार सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय विभागांना काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत.

फडणवीस सरकारकडून अंतर्गत सर्व सरकारी विभागांच्या निधी खर्चात 20 टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः रस्ते निर्माण आणि सिंचन प्रकल्पांमधील अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
जरी प्रशासकीय खर्चात कपात केली जात असली, तरीही सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या योजनांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. शिक्षण, आरोग्य सेवा, शेतकरी कर्जमुक्ती आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा निधी जसाच्या तसा ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १1500 रुपये दिले जात असून, त्यासाठी मोठा निधी खर्च होत आहे.तिजोरीतील उपलब्ध निधीचा प्राधान्याने वापर दुष्काळ निवारण, जलसंधारण, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्व विभागांच्या सचिवांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य ते प्रशासकीय निर्णय घ्यावेत, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.








