लोणी काळभोर, ता. 19 : मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील झगडे वस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत सुमारे 21 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 17ऑक्टोबरच्या रात्री दहा ते 18 ऑक्टोबरच्या पहाटे सव्वापाचच्या दरम्यान ही चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी किरण दत्तात्रय झगडे (वय 34, रा. झगडे वस्ती, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झगडे यांचा लोणी काळभोर येथील हाडके फूड कोर्टमध्ये ‘चटपटा जंक्शन’ नावाने फास्ट फूडचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त ते रात्री उशिरा घरी येत असल्याने त्यांचे वडील घराचा मुख्य दरवाजा कडी न लावता बंद करून झोपत असत.

किरण झगडे हे नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी 17 ऑक्टोबर रोजी गेले होते. रात्री ते घरी न परतता व्यवसायाच्या ठिकाणीच थांबले. दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्यांच्या वडिलांना घरातील कपाटे उघडी असल्याचे दिसले. किचनमधील लाकडी कपाटासह बेडरूममधील लोखंडी कपाटाचे ड्रॉवर उघडे होते. त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. वडिलांचा फोन आल्यानंतर किरण झगडे यांनी तातडीने घरी धाव घेतली. घरातील परिस्थिती पाहून त्यांनी 112 क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर मांजरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच श्वानपथक आणि इतर तपास पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली.

घरातील कपाटांची तपासणी केली असता सोन्याचे दोन बिस्किटे आणि सोन्याच्या अंगठ्यांसह इतर दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 10 तोळ्यांचे एक सोन्याचे बिस्कीट, दोन तोळ्यांचे एक सोन्याचे बिस्कीट आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या ऐवजाची एकूण किंमत सुमारे 21 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. घरातील कपाटे उघडून सोन्याचा ऐवज लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांजरी पोलीस करीत आहेत.







