केडगाव : कुटुंबीय ऊस लागवडीच्या कामासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. हि घटना केडगाव (ता. दौंड) येथील शेलार मोरेवस्ती परिसरात घडली असून शनिवारी (ता.29) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याप्रकरणी प्रफुल्ल बाळासाहेब कदम (वय 29, रा. देशमुखमळा, शेलार मोरेवस्ती, केडगाव) यांनी यवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम कुटुंबीय शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुसऱ्याच्या शेतात ऊस लागवडीच्या कामासाठी गेले होते. घराला कुलूप लावून कुटुंबीय दुपारी साडेबारा वाजता घरी परतले. त्यावेळी घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळून आले.

घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणी केली असता सुमारे सव्वा तोळ्याचे मनी गंठन, सोन्याचे झुबे व वेल, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि 5 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

कदम यांनी घर व परिसरात शोध घेतल्यानंतरही ऐवज मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याची खात्री झाली. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.







