पुणे: सायबर चोरटे आता ज्येष्ठ नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात असाच एक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने कुरिअरने पार्सल पाठवल्याचे सांगून भामट्यांनी एका 82 वर्षीय निवृत्त प्राचार्याची 3,23,219 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 ते 30 सप्टेंबरदरम्यान संबंधित ज्येष्ठ नागरिकाशी सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलाने महत्त्वाचे पार्सल पाठवले असून ते घरी पोहोचवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असे सांगण्यात आले. या बहाण्याने चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर पार्सलच्या डिलिव्हरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या दोन्ही मोबाईल फोनमध्ये एक संशयास्पद ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यांच्याकडून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती भरून घेण्यात आली. तसेच, त्यांच्या मुलाच्या व्हॉट्सॲपवरून संदेश आल्याचा भास निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्यात आली.

या प्रक्रियेदरम्यान भामट्यांनी दोन्ही मोबाईल फोनचा ताबा मिळवल्याचा आरोप आहे. मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळाल्यानंतर त्यांनी बँक खात्यातील 3,23,219 रुपये परस्पर काढून घेतले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त प्राचार्यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस आणि सायबर सेल करत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाउनलोड करू नये. तसेच बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






