सासवड, ता. 19 : मालकी हक्काच्या शेतजमिनीत वीस ते पंचवीस बाउन्सर आणि महिलांना सोबत घेऊन आलेल्या संशयितांनी शेतमालक कुटुंबाला धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना घडली. तसेच जेसीबीच्या साहाय्याने गोशाळेचे लाकूडफाटा ओढून गोशाळेचे नुकसान केले आणि शेतात उभे असलेले मका पीक व नारळाची झाडे उद्ध्वस्त करत दहशत माजवल्याप्रकरणी 20 ते 25 बाऊन्सर आणि महिलांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (ता. 17) वीर, (ता. पुरंदर) गावचे हद्दीतील शेत जमीन गट नंबर 721, 722, 723 येथे घडली. याप्रकरणी कोमल अजित गवरे (वय 30, व्यवसाय शेती रा. वीर ता पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहीत सुनील शिंदे, निशा बाळकृष्ण देशमुख व 20 ते 25 बाउन्सर व महीला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शिंदे, निशा देशमुख आणि त्यांच्यासोबत आलेल्या बाऊन्सर व महिलांनी शेतात प्रवेश करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी काही बाऊन्सरनी हाताला धरून ओढत हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. निशा देशमुख यांनी संबंधित शेतजमीन विजय मारुती ढोणे आणि अॅड. गीतांजली ढोणे यांचा प्लॉट असल्याचे सांगून फिर्यादीला धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींनी जेसीबीच्या साहाय्याने गोशाळेचे लाकूड ओढले, गोशाळेच्या मागे पेरलेल्या मक्याच्या पिकाचे नुकसान केले आणि लावलेली नारळाची झाडे उपटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, “बाहेर भेटा, मग तुम्हाला पाहून घेतो,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत.






