न्हावरे: वीजमीटर बायपास करून अनधिकृतपणे वीज वापरल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील दोघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मागील एका महिन्यात ८९८ युनिट वीजचोरी करून महावितरण कंपनीचे अंदाजे १५ हजार ९० रुपये आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी जयंत धनराज गेटमे (वय ४९, व्यवसाय नोकरी, भरारी पथक महावितरण, पुणे ग्रामीण, रास्तापेठ, पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार भाऊसो पोपट वाघमोडे आणि मुनसाब अली यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आलेगाव पागा येथील वाघमोडे वस्तीवर वीजचोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यावेळी वीजग्राहक भाऊसो पोपट वाघमोडे आणि वीज वापरणारे मुनसाब अली यांनी वीजमीटर बायपास करून अनधिकृतपणे वीज वापरल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे मागील एका महिन्यात ८९८ युनिट विजेची चोरी झाल्याचे आणि महावितरण कंपनीचे अंदाजे १५ हजार ९० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, या प्रकरणातील एक लाख रुपयांची तडजोडीची रक्कम अद्याप भरलेली नसल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रविवारी (ता.१८) रात्री उशिरा शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.







