पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरील मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल करत, “तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन मला दिलेत का?” असा गंभीर प्रश्न विचारला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जरांगे पाटील यांनी नारायण गडावर बोलताना सांगितले की, दोन ते अडीच वर्षांपूर्वी एक मोठे षडयंत्र रचले गेले होते. मला याची माहिती सात-आठ महिन्यांपूर्वीच मिळाली होती, पण अंतरवली येथे उपोषणाला बसल्यानंतर मला यामागची भयंकर माहिती समजली. भाजप आणि शिंदे गटातील काही नेते माझ्याबद्दल असा संशय व्यक्त करत आहेत की, श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मला 500कोटी रुपये देण्यात आले आहेत.

आता यावर जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना संध्याकाळपर्यंत उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. “तुम्ही मला प्रत्यक्षात 500 कोटी रुपये दिले आहेत का? किंवा भाजपच्या नेत्यांना असे सांगितले आहे का? याचे स्पष्टीकरण द्या,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “जर तुम्ही पैसे दिले नसतील, तर भाजप तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही मला संपवत आहात, याचा छडा मी लावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.








