पुणे : CJPचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजित दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक 16 मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली.

सहकारी कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका सध्या तुरुंगात असून त्यांना अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्यानेच आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. हा व्हिडीओ शेअर करताना ते भावूक झाले होते.

अभिजित दीपके यांनी सांगितले की, सौरभ आणि आशुतोष हे त्यांच्या भावांसारखे आहेत. आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना रस्त्यावर मारहाण झाली असून, अटकेत असताना त्यांचा छळही करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या कुटुंबांवर मोठा ताण येत आहे. द्वेषापेक्षा प्रेम आणि अहिंसेचा मार्ग मोठा असतो; त्यामुळे भावना ही आपली कमजोरी नसून ताकद आहे. सौरभ आणि आशुतोष तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा आणि रणनीती ठरवली जाईल.

संविधान आणि महात्मा गांधींच्या शांतता व अहिंसेच्या तत्त्वांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. आगामी सणासुदीच्या आणि दिवाळीच्या काळात सर्व समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. सौरभ दास आणि आशुतोष रांका लवकरच बाहेर येतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी समर्थकांना या कठीण काळात दोन्ही सहकाऱ्यांची आठवण ठेवण्याची विनंती केली.






