अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: गुन्हे अपघात तसेच बेवारस स्थितीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनांचा शोध घेऊन ती पुन्हा मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी शिक्रापूर पोलिसांनी केली असून अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ६७ वाहने शोधून त्यांचे मूळ मालक गाठत पोलिसांनी 37 लाख वीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल परत केला आहे ३७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत केले असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील अपघातांतील तसेच बेवारस स्थितीत मिळालेली अनेक वाहने दीर्घकाळ पडून होती.

या वाहनांचे मूळ मालक शोधून त्यांना वाहने परत देण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते मात्र पोलिसांनी वाहनांचे आरटीओ क्रमांक चेसि क्रमांक आणि इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास सुरू करून तांत्रिक माहितीच्या मदतीने संबंधित वाहनमालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही वाहने त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली.
शिक्रापूर पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी १३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ३२ दुचाकी मूळ मालकांना परत केल्या होत्या. त्यानंतर १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी आणखी २३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ३५ दुचाकी व चारचाकी वाहने मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या अशा प्रकारे दोन महिन्यांत एकूण ६७ वाहने आणि ३७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेले वाहन पुन्हा मिळवण्यासाठी अनेकदा नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते मात्र शिक्रापूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे वाहनमालकांचा शोध घेऊन वाहने परत करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला त्यामुळे नागरिकांची अडकून पडलेली मालमत्ता त्यांना पुन्हा मिळाली आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासोबतच नागरिकांच्या मालमत्तेची योग्य ती परतफेड करण्यासाठी पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
बेवारस वाहनांच्या मालकांना पोलिसांचे आवाहन
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात अद्यापही काही बेवारस वाहने पडून आहेत संबंधित वाहनमालकांनी वाहनाच्या मालकी हक्काचे पुरावे आणि आवश्यक कागदपत्रांसह शिक्रापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा नियमानुसार संबंधित वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मुद्देमाल कारकून एन. डी. नाईकडे मो. ७५८८१४५३७० किंवा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मो. ९९२३६३०६५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे आणि अक्षदा पाणमंद यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून लाखो रुपयांची वाहने मूळ मालकांना परत मिळवून देत शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांना एक प्रकारचा दिवाळीचा बोनसच दिला आहे.







