उरुळी कांचन (पुणे) : पुणे जिल्ह्यातील नामांकित आणि ‘देखणी ग्रामपंचायत’ म्हणून ओळख असलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत ढिम्म झाला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि विशेषाधिकार प्राप्त व्यक्ती प्रशासक सरपंच म्हणून विराजमान आहे. देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या आलिशान ग्रामपंचायत वास्तूत पदाधिकारी व सदस्य चकाचक खुर्चीत बसत आहेत; मात्र बाहेर संपूर्ण उरुळी कांचन गाव कचऱ्याच्या आणि दुर्गंधीच्या विळख्यात सापडले आहे.

वारंवार वृत्तपत्रांतून व न्यूज पोर्टल्सवरून बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासक मिलिंद जगताप आणि ग्रामपंचायत अधिकारी टी. एस. पाटील यांच्या कानठळ्या बसल्यासारखी परिस्थिती असून, कचरा हटवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

उरुळी कांचन व परिसरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नामांकित महत्मा गांधी महाविद्यालयाच्या शाळेच्या गेटच्या बाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रेल्वे मोरी परिसर, गल्लोगल्ली आणि पुणे-सोलपूर महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे साचलेले ढीग उरुळी कांचनच्या वैभवाला गालबोट लावत आहेत.

कालच एका न्यूज पोर्टलने शाळेसमोरील कचऱ्याची बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कारवाई तर दूरच; उलट बातमी आल्यानंतर त्या जागेवर आधीपेक्षाही जास्त कचरा येऊन पडला आहे! यामुळे प्रशासनाचा कचरा हटाव मोहिमेवर कोणताही वचक राहिला नसल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडे कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही साधनसामग्री कमी नाही. तरीही गाव घाणीत बुडाले आहे. यामध्ये 6 घंटागाड्या, 1 मोठा कंटेनर, 1 ट्रॅक्टरवर 5 पुरुष कर्मचारी व 8 महिला साफसफाई कर्मचारी असा तब्बल 15 ते 20 कर्मचाऱ्यांचा ताफा आणि एवढी अद्ययावत वाहनांची यंत्रणा पाठीशी असतानाही जर गल्लोगल्ली कचरा तुंबून राहत असेल, तर “नेमके प्रशासक मिलिंद जगताप आणि ग्रामपंचायत अधिकारी टी. एस. पाटील यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण उरलेले नाही की हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत?” असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
व्हीआयपी संस्कृती बंद करा, अन्यथा नागरिक कचरा कार्यालयात टाकणार..
“उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे नाव केवळ वास्तूने आणि व्हीआयपी संस्कृतीने मोठे होत नाही, तर स्वच्छतेने होते,” सरपंच प्रशासकांनी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील चकाचक खुर्च्या सोडून रस्त्यावर उतरून स्वच्छता पाहावी, अन्यथा रस्त्यांवरील हा कचरा उचलून थेट ग्रामपंचायत कार्यालयात टाकण्याचा इशारा नाव न छापण्याच्या अटीवर पुणे प्राईमशी बोलताना नागरिकांनी दिला आहे.







