आदित्य बोराटे –

इंदापूर – तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आता आधुनिकतेची जोड मिळाली आहे. इंदापूर बस आगारात इलेक्ट्रिक ‘ई-शिवाई’ बससेवेचा शुभारंभ करण्यात आला असून, इंदापूर-बारामती आणि बारामती-इंदापूर मार्गावर ही बस विना वाहक धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे आणि इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 10) या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक प्रशांत उंबरे, अक्षय सूर्यवंशी, शकील सय्यद,शुभम पवार,शिवाजीराव मखरे, अमोल मिसाळ,अजिंक्य ढाणे आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, “राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार, नोकरदार आणि व्यापारी अशा सर्व घटकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विकासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. विकासकामांसोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधांना प्राधान्य देण्यात येत आहे.”
तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. विकास हा केवळ एका घटकापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, या दृष्टिकोनातून विविध विकासकामांना चालना मिळत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात सर्वच क्षेत्रांत विकासाची सकारात्मक दिशा दिसून येत असल्याचे शहा यांनी नमूद केले.
विना वाहक ई-शिवाईची सेवा
इंदापूर-बारामती आणि बारामती-इंदापूर या मार्गावर सदर ई-शिवाई बस धावणार असून, ही सेवा विना वाहक असणार आहे, अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे यांनी दिली. इलेक्ट्रिक बससेवेमुळे प्रवाशांना आधुनिक व आरामदायी प्रवासाची सुविधा मिळण्याबरोबरच पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे.
इंदापूर आगाराचे आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वाहतूक निरीक्षक अपर्णा पवार, लेखाकार रवींद्र डोके, वाहतूक नियंत्रक विक्रम चंदनशिवे, शंकर कोरटकर, उमेश काळे, विजय फडतरे यांच्यासह आगारातील प्रशासकीय कर्मचारी, चालक, वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.






